दिवाना दिल खो गया (भाग ११)

 

Pic Credit : Google 

(दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली. 

त्यांना झोपून काही तास उलटले असतील.  इतक्यात रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले.

पुढे पाहतात तर काय????) आता पुढे.... 

सिलूने दरवाजा उघडला तर समोर एक पोलिस उभा होता आणि सगळीकडे धावपळ चालली होती. सिलूला काहीच कळत नव्हते. नक्की काय चाललय ते.

तो पोलिसाला काही विचारणारच होता तेवढयात तो पोलिस स्वत:च सिलूला म्हणाला, “तुमच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे आणि ती हवेमुळे सगळीकडे पसरतेय. म्हणून आम्ही ही इमारत पूर्णपणे खाली करत आहोत. कृपया तुमच्या घरात अजून कोण असतील त्यांना घेऊन आमच्याबरोबर चला आणि नीट खात्री करा सगळी कुटुंबीय आहेत का. बी क्वीक.”

सिलूने मग कसलाही विचार केला नाही. मुग्धाला घेऊन तो पोलीसाच्या मागे पळाला. सिलू ६ व्या मजल्यावर राहत होता. पोलिसाने सिलू, मुग्धा आणि त्यांच्या फ्लोरवर राहणाऱ्या अजूनकाही जणांना सुखरूप इमारतीच्या खाली आणले. आग खूपच पसरत होती. नशीब पोलिस वेळेवर आले नाहीतर कोणाचे काही खरे नव्हते. अग्निशामक दलाचे लोक आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते.

मुग्धा ह्या सर्व प्रकारामुळे भलतीच घाबरली होती. एव्हाना जॉर्जचा फोन सिलूला आला, “सिलू तू कुठे आहेस? मुग्धा आणि तू ठीक आहात ना? सगळ्या न्यूज चॅनेलवर तुमच्या बिल्डींगचीचं न्यूज दाखवत आहेत.” 

“मी ठीक आहे जॉर्ज. पण मुग्धा थोडी घाबरली आहे. सो प्लीज तू गाडी घेऊन येशील का मी मुग्धाला तुझ्याबरोबर पाठवतो. इकडे सगळे नीट व्हायला उद्याचा दिवस जाईल. तोपर्यंत मला इथेच थांबावे लागेल”, सिलू म्हणाला.

“थांब मी मीराला सोबत घेऊन येतो म्हणजे ती मुग्धाला घरी घेऊन जाईल आणि मग मी तुझ्याबरोबर इथेच थांबेण”, असे बोलून जॉर्ज आणि मीरा त्यांच्या घरातून निघाले.

मुग्धा सिलूला सोडून कुठेही जायला तयार नव्हती पण जॉर्ज त्याच्याबरोबर थांबतोय हे कळल्यावर ती मीरा सोबत जायला तयार झाली.

जॉर्जने येताना सोबत पाण्याची बाटली आणि एक-दोन वेफर्सची पॅकेट्स आणली होती. एव्हाना आग बऱ्यापैकी आटोक्यात आली होती. पण पहिल्या मजल्यावरचे २ फ्लॅटमधील सामान पूर्णपणे जळून गेले होते. ह्या सगळ्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. हा पण त्या फ्लॅटमध्ये राहणारी २ माणसे जखमी झाली होती. त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पूर्ण आग विझेपर्यंत पहाटेचे ४ वाजले त्यांनंतर सर्वांना बिल्डिंगमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. सिलूने रूमवर जाऊन सगळे व्यवस्थित आहे की नाही ते चेक केले. त्यानंतर तो जॉर्जबरोबर त्याच्या घरी गेला. मुग्धा सिलूची वाट बघत जागीच होती. सिलूला आलेले पाहिल्यावर मुग्धाने सिलूला गच्च मिठी मारली. त्यानंतर पूर्ण दिवस ते दोघे जॉर्जच्या घरीच थांबले. 

मुग्धाचा मूड ठीक करण्यासाठी सिलूने तिला अमेरिकेची सैर करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने सर्व व्यवस्था केली. मुग्धा खूप खूप खुश होती. तिला सिलूबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवायला मिळत होता.

मुग्धा अधूनमधून घरी फोन करीत असे. सिलूचा ही त्याच्या घरी रोज फोन होई. तरीही अजून त्या दोघांच्याही घरी त्यांच्या नात्याबद्दल माहीत नव्हते.

अमेरिकेत पूर्णपणे स्थिरस्थावर झाल्याशिवाय सिलू घरी सांगणार नव्हता. त्याला माहीत होते एकवेळ अप्पा त्याच्या लग्नासाठी तयार होतील. पण अम्मा ती कधीच तयार होणार नाही. त्यासाठी सिलूला काहीतरी शक्कल लढवावी लागणार होती. पण सध्यातरी त्याला खूप वेळ होता. 

मुग्धा आणि सिलूची अमेरिका सफर खूप छान झाली. चार दिवसात जितके अमेरिका पाहता येईल तितके त्यांनी पाहिले. ती दोघ घरी आली.  इतक्यात मुग्धाला तिच्या घरून फोन आला.

तिच्या वडिलांचे अॅक्सिडेंट झाले होते. त्यामध्ये त्यांना जबर मार लागला होता. सध्या ते हॉस्पिटलमध्ये होते. मुग्धाला तिच्या लहान बहिणीने हे फोन करून सांगितले. फोन ठेवताच मुग्धा जोरजोरात रडायला लागली. सिलूने लगेच त्याच दिवशीचे मुंबई जाण्याचे विमान तिकीट कसेबसे बूक केले. मनात नसतानाही ४ दिवस आधीच मुग्धाला मुंबईला जावे लागत होते. 

अगदी जड अंत:करणाने तिने सिलूचा निरोप घेतला आणि ती मुंबईला निघाली. हे सगळे इतके अचानक घडले की, आत्ता मुग्धा इथे होती आणि पुढच्या क्षणी ती इथे नाही. ही कल्पनाही सिलूला सहन होत नव्हती.   

क्रमश:

(सिलू आणि मुग्धाच्या प्रेमकथेचे पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)

@preetisawantdalvi

 


No comments:

Post a Comment