अक्षय्य तृतीया माहिती

                                                                                                                   Pic credit: Google 


हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' म्हटले जाते. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. 

अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘ज्याचा कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे सर्व अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात.

पुराणकथेनुसार या दिवशी महाभारताचे युध्द संपून महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची  रचना करण्यास आरंभ केला होता आणि लिहीण्याचे कार्य श्री गणेश यांनी केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. ह्याच दिवशी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठविली होती. तसेच देवी अन्नपूर्णा हिला देवी पार्वतीचे रुप मानले जाते, तर या देवी अन्नपूर्णेचा जन्म सुद्धा याच शुभ दिवशी झाला होता. काही ठिकाणी या दिवशी लोक अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान सुद्धा देतात. असे म्हणतात की, युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी 'अक्षय पात्र' वरदान म्हणून मिळाले होते. वनवासा दरम्यान द्रौपदीचे भोजन होत नाही तोपर्यंत या अक्षय पात्रातील अन्न कधीही संपत नसे. त्याचबरोबर भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट सुद्धा अक्षय तृतीयेदिवशीच झाली होती.

अक्षय तृतीया या तिथित सौभाग्य आणि शुभ फळाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी केले जाणारे कार्य मनुष्याच्या जीवनात कधी न समाप्त होणारे फळ देते. म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी मनुष्य जेवढे पुण्य कार्य व दान धर्म करतो त्याचे शुभ फळ त्याला निश्चितच मिळते.

या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते. अक्षय तृतीयेपासुन अनेक ठिकाणी लोक आपल्या पुर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोया सुरू करतात अनेक ठिकाणी काठोकाठ भरलेले थंड पाण्याचे रांजण आपल्याला दृष्टीस पडतात. 

नव्या घरात गृहप्रवेश, वास्तु पुजन, नव्या व्यवसायाचा आरंभ, शुभविवाह, यांसारख्या गोष्टींकरता हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवे अलंकार, सोने, चांदी खरेदी केल्यास ती अक्षय होत असल्याने सोनारांच्या दुकानात या दिवशी मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळते.

परमेश्वराला आणि आपल्या पुर्वजांना आपण स्मरूण आपण जे कार्य करतो ते सर्व या दिवशी अक्षय अर्थात अविनाशी होते.

(हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.)

धन्यवाद 

@preetisawantdalvi

 

 

 

 

 

14 comments: