![]() |
Image by Shantanu Kashyap from Pixabay |
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी नागदेवतेला दुर्वा, आघाडा, दूध, लाह्या वाहून व दूध, साखर आणि नेवऱ्या म्हणजेच उकडीच्या पुरणाची दिंड यांचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते.
आपल्या भावाला चिरंतन आयुष्य मिळावे आणि त्याचे प्रत्येक संकटातून रक्षण व्हावे यासाठी काही स्त्रिया या दिवशी उपवास ही करतात.
तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात.
असे म्हणतात की, नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे..अशा प्रथा आजही काही ठिकाणी सुरू आहेत.
यानंतर येणारा सण म्हणजे राखीपोर्णिमा याला रक्षाबंधन असेही म्हटले जाते.या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन अत्यानंदित होते.राखीपोर्णिमेदिवशी नारळीपोर्णिमा हा कोळी बांधवांचा सण सुद्धा साजरा केला जातो. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात. तसेच समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो, म्हणून या काळात कोळी बांधव मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.
श्रावण महिन्यात काही ठिकाणी मंगळागौर हे हिंदू धर्मातील व्रत केले जाते. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे.
तसेच खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणी- "लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या,
अठूडं केलं गठूडं केलं" आदी म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.
श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंदयशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदीआनंद झाला.
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
अश्या या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने….
वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. या दिवशी बैलांचा थाट असतो त्यांना कामापासुन आराम असतो या दिवशी बैलांना सजवले जाते व त्यांची पूजा केली जाते तसेच त्यांना पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य ही दिला जातो.
(अशी ही श्रावण महिन्यातील सणांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कंमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. तसेच ही माहिती आवडल्यास ती तुमच्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा..धन्यवाद
@preetisawantdalvi
अतिसुंदर ������
ReplyDeleteतुम्ही छान माहीती सांगितली आहे.
ReplyDeleteधन्यवाद🙂
DeleteKya baat hai
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे
ReplyDeleteThanks..
Deleteखूप छान
ReplyDeleteThanks..
DeleteMasta
ReplyDeleteThanks..
DeleteMasta
ReplyDeleteThanks..
Delete