रक्तपिपासू (भाग १)



नेहा तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी, अतिशय लाडकी, ज्या वस्तूवर बोट ठेवेल ती वस्तू तिला मिळवून देणारे तिचे वडील म्हणजे अभय ठाकूर. तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती. पण अभयने त्याच्या ह्या प्रेमाच्या फुलाला अगदी काळजाच्या तुकड्यासारखे जपले होते. अभय त्याच्या पत्नीच्या सुमनच्या निधनानंतर लहान नेहाला घेऊन मुबंईत शिफ्ट झाला होता. तिथेच त्याने त्याचे बस्तान मांडले. ते कायमचे. ते दोघे त्यांच्या छोट्याशा दुनियेत फार खुश होते.

पण म्हणतात ना, वर वर कितीही चांगलं दिसलं तरी कधी कधी कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात त्याच्या भूतकाळातील गूढ, रहस्यमय अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात. तसचं काहीतरी अभयचं होतं..इतके सगळे चांगले असूनही त्याच्या मनात काहीतरी होतं ज्यामुळे तो रात्र.... रात्रभर जागत असे. त्याला फक्त नेहाची काळजी होती. नेहा कधी कधी तिच्या आईबद्दल अभयला विचारात असे. पण त्यावेळी अभय काहीतरी कारण काढून वेळ मारून नेत असे. नेहा आता कॉलेजला जायला लागली होती. पण तरीही आईबद्दल जाणण्याची उत्सुकता तीला चैन पडू देत नव्हती.

एकदा असंच अभय कामासाठी बाहेर गेलेला असताना नेहाने त्याची माळ्यावरची ट्रंक काढली आणि त्यामध्ये आईबद्दल काही मिळतंय का ते बघितलं. तेव्हा तिला तिथे १-२ घराचे फोटो मिळाले. घर काय वाडाच होता तो. नेहाला खूप उत्सुकता होती ह्या फोटोमधल्या घराबद्दल जाणून घ्यायची. तिने ते फोटो त्या ट्रंकेतून काढून स्वतःजवळ ठेवले आणि अभयच्या येण्याची वाट पाहू लागली. अभय घरी आल्यावर कधी एकदाची त्याला हे फोटो दाखवतेय असं नेहाला झालं होते.

जेवण वैगैरे आटपून झाल्यावर नेहाने अभयला ते फोटो दाखवले. पण एखादी पाल झटकतात तसे त्याने ते फोटो झटकले. अभय रागाने लालबुंद झाला होता. अभयला इतका रागवलेला नेहा प्रथमच बघत होती. त्याने ते फोटो फाडून जेव्हा जाळले तसा तो शांत झाला. नेहा घाबरून त्याला बिलगली.
"बाबा, काय झालं, तू इतका का रागवलास? ते कोणाच्या घराचे फोटो होते?" नेहा म्हणाली.
अभयला काय बोलावे हेच कळतं नव्हते. कारण ज्या भूतकाळापासून तो नेहाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तोच अनपेक्षितपणे त्याच्या समोर येवून ठाकला होता. नेहा पण आता मोठी झाली होती, त्यामुळे योग्य तेच कारण जे नेहाला पटेल असे त्याला देने भाग होते.

नेहा केव्हाची झोपली होती आणि अभय आराम खुर्चीवर बसून विचार करत होता. विचार करता करता अभय भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेला.

श्रीरंगपूर त्या वेळेचे संपन्न गाव. दिनकर ठाकूर म्हणजेच अभयचे आजोबा त्यागावचे पाटील. त्यांचा प्रशस्त असा दुमजली पण विस्तारित वाडा होता. नोकर-चाकरांची काहीच कमी नव्हती. पैसा तर पाण्यासारखा होता. दिनकर ठाकूर यांना २ मुलगे. एक अभयचे वडील सुधाकर आणि काका मधुकर. दोघे भाऊ म्हणजे एकमेकांचे जीव की प्राण. दोघांच्या वयात फक्त १ वर्षाचे अंतर होते. घरात दिनकररावांचा दरारा होता. त्यामुळे त्यांचा शब्द तो अखेरचा असे.

सुधाकर आणि मधुकर दोघेही आता बऱ्यापैकी लग्नाच्या वयात आले होते. दिनकररावांनी दोघांच्याही लग्नाचा बार एकाच वर्षात उडवून दिला. आता वाड्यात २ सूना आल्या होत्या. सुधाकरच्या पत्नीचे नाव सुमन आणि मधुकरच्या पत्नीचे नाव रखमा. सुमन ही प्रतिष्ठित घराण्याची होती, तर रखमा ही अगदी गरीब घरची आणि स्वभावाने ही तितकीच सालस, शांत, पण दिसायला इतकी सुंदर की अप्सरा ही लाजतील तिच्या सौंदर्यापुढे. या दोघींच्या येण्याने वाडा अगदी भरून पावला होता. काही महिन्यांनंतर सुधाकरला पुत्ररत्नाचा लाभ झाला. खूप हौशेने दिनकर रावांनी नातवंडाचे नाव अभय ठेवले. आता हळूहळू अभयची पावलं सगळ्या वाड्याभर चालू लागली. सगळे खूपच खुश होते. आता सगळ्यांच्या नजरा मधूकरकडे होत्या. पण काही केल्या रखमाची कूस काही उजवत नव्हती. रखमा सारखी चिंताग्रस्त असे. ती सगळे उपास-तापास करीत असे. कोण सांगेल ते सगळे उपाय करीत असे. पण गुण काही येत नव्हता. मधुकर तिला सारखा धीर देत असे.
असं म्हणतात ना की, आपण कोणाचं काही वाईट केलं नसेल तर देव ही आपलं चांगलंच करतो. रखमाच्या ही बाबतीत अगदी तसचं झालं, तिची कूस उजवली आणि काही महिन्यांनी तिला ही पुत्ररत्नाचा लाभ झाला.

वाडा अगदी गजबजून गेला होता. मधुकर आणि रखमा यांनी त्यांच्या मुलाचे नाव विक्रम ठेवले. अभय आणि विक्रम या दोघांमध्ये अवघ्या ३ वर्षांचा फरक होता. हळूहळू दोघेही मोठे होतं होते. विक्रम अभयला दादा म्हणून हाक मारे. दिवसभर दोघे घरभर खेळत असत. दिनकररावांना दोन्ही नातवांचे खूपच कौतुक असे.

पण म्हणतात ना, आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात. अगदी तसचं काहीतरी दिनकररावांच्या आयुष्यात आणि ह्या वाड्यात घडलं आणि हळूहळू सगळा वाडा रिकामा झाला. त्यामध्ये वाचले फक्त विक्रम, अभय आणि नेहा!!

विक्रमच्या सांगण्यावरूनच अभय मुबंईला निघून आला तो पण कायमचाच!! कारण त्यांना दोघांना नेहाची काळजी होती. असं म्हटले तरी चालेल..त्यांना नेहाला वाचवायचं होतं!!

क्रमश:

(ही कथा कशी वाटली मला नक्की कळवा..पुढचा भाग लवकरच पोस्ट करेन..धन्यवाद)

@preetisawantdalvi


6 comments:

  1. पुढच्या भागाची आतुरता

    ReplyDelete
    Replies
    1. पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेज ला भेट द्या..
      https://www.facebook.com/preetisawantdalvi/

      Delete
  2. खूप छान पुढील भागाची आतुरता राहील.

    ReplyDelete
    Replies
    1. पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेज ला भेट द्या..
      https://www.facebook.com/preetisawantdalvi/

      Delete
  3. Eager for next episode it's very disturbing that even today perception of society towards Girl child remainsthe same.Hope that's what is conveyed.

    ReplyDelete
    Replies
    1. पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेज ला भेट द्या..
      https://www.facebook.com/preetisawantdalvi/

      Delete