रक्तपिपासू

नमस्कार,
'रक्तपिपासू' ह्या कथेचे  पुढील भाग तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वाचता येतील ..
श्रीरंगपूरमधला गूढ रहस्यमय वाडा आणि त्यामध्ये दडलेले गुपित काय असेल? हे जाणण्यासाठी वाचत राहा कथामालिका "रक्तपिपासू"

रक्तपिपासू (भाग १ ते २६)


यापुढील भागांची लिंक मी लवकरच पोस्ट करेन..धन्यवाद🙂



 

पौराणिक कथा (अंतिम भाग)

 


या भागात आपण पौराणिक राक्षसांची माहिती घेणार आहोत.

आपण बहुतेक वेळा अत्यंत रक्तपात असणारे भयपट चित्रपट पाहतो त्याच प्रमाणे भयकथा पण वाचतो. पण यामुळे बऱ्याच वेळा भयावह स्वप्न पडल्याचे किंवा मानसिक आघात झाल्याचे आपल्याला अनुभवायास मिळते. 

आपण परीकथा, दंतकथा आणि पौराणिक राक्षस अशा कथा सुद्धा ऐकत आलो आहोत. जगातील सर्व धर्मात अशा अध्यात्मिक संस्कृतीची आणि धर्माची विशेष ओळख म्हणुन स्वतःच्या धर्मातील घटनांचे रहस्यमय दृष्टांत सांगितलेले आहेत.

काही घटना या अचानक कोणी अदभुत विभूतीने प्रकट होऊन मदत केली, त्यांचा दयाळूपणा आणि प्रेमाबद्दलच वर्णन केलेले असते. तर काही घटना मात्र भयानक आणि भीतीदायक असून, त्यांचे काही भयानक प्राण्यांमध्ये रुपांतर होते अशा पण घटना आहेत.

ह्या सगळ्या कथांमध्ये किती सत्यता आहे हे सांगणे कठीण आहे. परंतु, एक जनरल नॉलेज म्हणून तुम्ही त्याकडे नक्की पाहू शकता. मला सुद्धा ह्याच माहिती मुळे पौराणिक राक्षसांबद्दल कळले. जी माहिती मी तुम्हा सर्व वाचकांसोबत शेअर करू इच्छिते. 

अशीच एक कथा ज्यु लोकसाहित्यातील आहे. ज्यू लोकसाहित्यांमधे एक विशिष्ट डिब्बुकी (अद्भूत प्राणी) राहतो, जो एका मृत पापी व्यक्तीचा आत्मा आहे.

असे मानले जाते की, तो जे दुष्ट लोक माणसांना त्रास देतात, त्यांच्यासाठी तो एक पाठीराखा असतो आणि गरिबांच्या यातना कमी करून दुष्टांना शिक्षा करतो. तो या कामासाठी एखाद्या परकाया शरीरात प्रवेश करतो. त्यावेळेस लोक त्याला डिब्बुकी संचारला असे म्हणतात. 

अशीच जिन्न बद्दल इस्लाम धर्मात रूढी आहे. इस्लामिक संस्कृतीमध्ये , एक पौराणिक प्राणी म्हणून, जिन्नची ओळख आहे. हा आपल्या अदभूत शक्तीने धूर आणि अग्नीपासून पंख तयार करुन एक क्षणात ज्यांनी आठवण केली तेथे पोहचतो. सर्व भूतखेत याच्या आज्ञेत राहुन त्याची सेवा करतात व तो सांगेल ते कोणतेही अशक्य काम आपल्या चमत्काराने शक्य करतात. इस्लाम धर्माच्या परंपरेनुसार भूताला इब्लिस नावाचा जिन्न म्हणून ओळखले जाते. 

पाश्चात्य देशांच्या धर्मात सुद्धा राक्षसांचे अस्तित्व असे मानले गेले आहे. भयंकर राक्षस हे जिवंत माणसांच्या शरीरात प्रवेश करुन त्यांच्या हातून वाईट किंवा पीडिताला अडचणीत मदत पण करतात. असे पौराणिक राक्षस लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करुन लोक धास्ती मुळे आजारी पडतात. काही लोक मुद्द्याम मला राक्षसाला भेटायचे आहे, त्याच्याशी लढायचे आहे अशी धेर्य आणि धाडस दाखविणारी भूमिका घेतात. त्यातून मानसिक धक्के बसुन बरेच लोक मनोरुग्ण झाले आहेत.

 आजकाल लोक जगातील इतर प्राण्यांवर / अदभूत चमत्कारावर विश्वास ठेवतात. उदाहरणार्थ, मलय देश (इंडोनेशियन) लोकसाहित्यांमधे एक निश्चित पोंटियानॅक (अद्भुत आत्मा) हडळ आहे.

तिचे लांब केस असुन ती (व्हँपायर) हडळ आहे. ही हडळ भितीदायक असून ती गर्भवती महिलांवर हल्ला करते. त्यांनी खालेले अन्न ती मंत्राने आपल्या पोटात घेते. त्यामुळे गरोदर महिलांना अशक्त पणा येतो. एखाद्या गरोदर महिलेस असा त्रास झाला तर त्यावर मंत्र तंत्राने उपचार करतात.

रशिया मध्ये राक्षस ही एक विकृत आणि त्रास दायक शक्ती आहे, याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्याला रक्तरंजित खाद्य आवडत असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

तो माणसाचे जगणे अनिश्चित आणि त्रासदायक करतो. त्याच्या अंगात पापी तत्व, पाण्याचे विष करणे , माणसावर भीतीदायक नकारात्मक प्रभाव, दुष्ट आत्म्याचे प्रतिनिधित्व असे त्याचे लक्षण आहेत. एखादा चांगला व्यक्ती त्याच्या मनात भरल्यास लपून तो त्याचा बळी घेतो. तसे त्याचे काही चांगले चमत्कार पण आहे. त्याच्या शक्तीने बुडणाऱ्या जहाजांमधील लोकांचे प्राण त्याने वाचविले असल्याचे लोक कथातून उल्लेख आहे.

समुद्रात पण असे भयानक आणि मनुष्याचे मांस खाणारी विशिष्ट राक्षस असल्याचे दक्षिण अमेरिकेतील एका देशाचे नागरिक भरवसा ठेवतात. दक्षिण अमेरिकेत एक देश अशा घटनांचा अनुभव असल्याचा उल्लेख करतो. 

ब्राझिलियन लोकसाहित्यांमध्ये इंन्टाटाडो, साप किंवा नदीतील डॉल्फिन मासा मनुष्य रूप धारण करतो, अशी एक दंत कथा कदाचित बर्‍याच जणांनी ऐकले असेल.

असे म्हणता की त्याला लैंगिक सुखाची आवड आणि संगीताचा छंद आहे. त्यामुळे तो विशेषतः स्त्रियाना आपल्या श्वासाने भुल पाडून त्याच्या बद्दल आकर्षण निर्माण करतो. स्त्री त्या भुलीस बळी पडल्यास शेवटी तिचा मृत्यू होतो. अशा कथा आहेत. 

"मॉन्स्टर ऑफ द वर्ल्ड" श्रेणीतील आणखी एक पौराणिक प्राणी म्हणजे गॉब्लिन.

त्याच्याकडे मानवी देखावा आहे. खूप उंच, केसाळ केस आणि चमकणारे डोळे. जंगलात राहतात, सहसा दाट आणि प्रवेश करण्यास अवघड किंवा अशा घनदाट अरण्यात त्यांचे वास्तव्य असते. ते गर्द झाडांमध्ये लपून बसतात. सतत एखादी व्यक्ती येते की काय यावर लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या हाव भावाने आणि टाळ्या वाजवून महिलांना स्वतःकडे आकर्षित करून उपभोग घेतात.

लोचनेस मॉन्स्टर, स्कॉटलंड या नावाचा एक तलाव असून त्याची 230 मी. खोली आहे. हा यूकेमधील पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे असे मानले जाते . याला सर्वात मोठा जलाशय, असून त्याला स्कॉटलंडमधील दुसर्‍या क्रमांकाचा पाणी साठा किंवा जलाशय असे म्हणतात. याची उत्पत्ती बऱ्याच काळापूर्वी म्हणजे युरोपमधील शेवटच्या बर्फ युगात पर्यंत जात असल्याचे संदर्भ आढळतात.

या तलावा बद्दल एक आख्यायिका असून या तलावामध्ये एक अदभुत रहस्यमय प्राणी राहतो. ज्याचा उल्लेख इ.स. 565 मध्ये प्रथम लेखी केला गेला होता. तथापि स्कॉट्स नावाच्या एका संशोधकाने प्राचीन काळापासून त्यांच्या लोककलांमध्ये जल राक्षसांचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख सत्य परिस्थिती वर आधारीत असून जल राक्षसांना सामुहिक "केल्पी" या नावाने ओळखतात.

आजकालचे आधुनिक लोक यांना नेस वंशाची ही एक उत्पत्ती असून या राक्षसांना नेसी असे म्हणतात. याचे संशोधक जवळपास 100 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. १८३३ मध्ये, एका विवाहित जोडपे समुद्र किनाऱ्याच्या जवळ विश्रांती घेत होते. विश्रांती घेत असताना, त्यांच्या डोळ्यादेखत काहीतरी अदभुत, आक्राळ विक्राळ आणि भयभीत करणारा प्राणी जात असतांना दिसला. यानंतर १००० पेक्षा पण जास्त साक्षीदारांनी त्यांनी अक्राळविक्राळ आकृती पाहिल्याचा दावा केला आहे.

वैज्ञानिकांनी याची गंभीर दखल घेतली आणि ते या घटनेवर सत्य परिस्थिती शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अद्याप हे गुढ रहस्य काय आहे, याची उकल त्यांना करता आली नाही.

आजपर्यंत अनेक स्थानिक लोकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, एक प्राणी दोन मीटर रुंद सरोवरात राहतो आणि ताशी 10 मैलांच्या वेगाने फिरतो. आधुनिक प्रत्यक्षदर्शींचा असा दावा आहे की नेसी खूप लांब मान असलेल्या राक्षसा सारखा आणि गोंधळलेला आहे, असे दिसते. 

हेडलेसच्या तथाकथित व्हॅलीचे रहस्य म्हणजे जो कोणी या क्षेत्रात जातो आणि तो कितीही सशस्त्र असला तरीही तिथून आतापर्यंत कोणी परतलेले नाही.

लोकांच्या अदृश्य होण्याच्या घटनेचे निराकरण अद्याप झाले नाही. जगातील सर्व राक्षस तेथे जमतात की इतर काही परिस्थितीमुळे लोक अदृश्य होतात की नक्की काय हे आज पण एक गुढ रहस्य आहे.

कधीकधी घटनास्थळी केवळ मानवी डोके सापडले आणि तेथील रहिवासी भारतीयांचा असा दावा आहे की हे सर्व घाटीत राहणाऱ्या बिगफूटने केले आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचा असा दावा आहे की त्यांना खोल दरीत एक प्राणी दिसला जो राक्षस केसाळ माणसासारखा दिसत होता.

द व्हॅली ऑफ हेडलेसच्या गूढतेची सर्वात विलक्षण बाब म्हणजे येथून माणुस दुसऱ्या एखाद्या विश्वात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार आहे की काय इतकी गुढता निर्माण झाली आहे. 

तुम्हाला जर याबाबत अधिक माहिती असेल तर मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर अशा काही दंतकथा ऐकल्या, वाचल्या असतील तर मला नक्की सांगा.

सध्यातरी ही कथामालिका मी इथे संपवत आहे. पुन्हा भेटू नवीन रहस्यमय कथेसोबत.

~समाप्त~

 (ही कथा आवडल्यास तिला शेअर नक्की करा. धन्यवाद)

©preetisawantdalvi  

 

पौराणिक कथा (भाग ३)

तुम्हाला माहीत आहे का, हिमालयापासून ते इंदु सरोवरापर्यंत भारताची भुमी ही देव निर्मिती असल्याने तिला 'देवभुमी' असे म्हटले जाते.

हिमालयाच्या पोटात अनेक रहस्ये साठवलेली आहेत. त्यापैकी ज्ञानगंगा सिद्धाश्रम हे पण एक रहस्य आहे.

तुम्ही कधी याबाबत कुठे ऐकलय का हो? असेल तर मला नक्की सांगा.

असो, असे म्हणतात की, पृथ्वीवरील अनेक चिरंजीव लोक जसे हनुमान वगैरे हिमालयातील ह्या गुप्त शहरांत राहतात, अशी मान्यता आहे. फक्त प्रचंड ज्ञान प्राप्ती केलेल्या लोकांनाच इथे प्रवेश आहे. हे स्थान अश्या प्रकारे वसवले गेले आहे कि अगदी उपग्रहातून सुद्धा ते स्पष्ट दिसू शकत नाही. 

तिबेट आणि भारतातील अनेक साधू भिक्षु लोकांनी प्राचीन ग्रंथात सिद्ध्लोकाबद्दल लिहून ठेवले आहे. काही जन आपला मृत्यू जवळ येताच तिथे निघून गेले आहेत.

हिमालयांत भ्रमण करणाऱ्या लोकांना अचानक कधी "यती" किंवा इतर "सिद्ध लोक" खूप वेळा दिसून येतात, पण नंतर त्यांचा शोध घेतल्यास ते सापडत नाहीत. कदाचित ते तिथेच राहत असावेत. 

तिबेटी लोक याला "संभलची रहस्यमय भुमी" म्हणतात. त्यांच्या अनुभवा नुसार याच नेमकं ठिकाण कैलाश पर्वताच्या एका खिंडीत आहे.

हनुमाना शिवाय इथे वसिष्ठ, विश्वामित्र, भीष्म, कृपाचार्य, शंकराचार्य, कणाद, परशुराम इत्यादी विभूती ध्यान मग्न आहेत. सदर आश्रमाचे रक्षण व्हावे म्हणून ४ प्रकारचे जीव गस्ती वर असतात. "यती" शिवाय "अर्ध मानव आणि अर्ध पक्षी" प्रकारचे जीव सुद्धा या भागात आढळून आल्याचे सैन्यासह बरेच प्रत्यक्षदर्शी सांगतात. 

एखादा मानव चुकुन तिथे पोचलाच तर त्याला त्या आश्रमात सर्व सुख सुविधा घेवून जीवन व्यतीत करावे लागते अशी सुरक्षा योजना आहे. दर रात्री अश्या मानवांची स्मरणशक्ती पुन्हा नवी होते आणि त्यांना वाटते कि ते आजच सिद्ध लोकांत पोहचले आहेत. शेकडो वर्षे पर्यंत हे मानव त्याच आश्रमात अडकून राहतात.

या अलौकीक आश्रमाचा उल्लेख चार वेदा शिवाय बऱ्याच पौराणिक ग्रंथात आढळतो. या सिद्धआश्रमाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एक बाजूला अद्भुत कैलास पर्वत, दुसऱ्या बाजूला ब्रह्म सरोवर तर तिसऱ्या बाजुला विष्णुतीर्थ आहे. पौराणिक कथा नुसार हा आश्रम ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून स्वतः विश्वकर्मा यांनी याची रचना केली आहे. याबद्दल अजून पौराणिक माहिती अशी आहे की, श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, शंकराचार्य, माता आनंदमयी आणि सर्व देवी विभुती सह-देह येथे आजही वास्तव्य करीत आहेत.

 

एक अजुन रहस्यमय गोष्ट म्हणजे ज्ञानगुंज नावाचा एक धर्मोपदेश ग्रंथ आहे, तो आज पण हिमालयात एका गुप्त रहस्यमय जागेत ठेवलेला आहे. या जागेत महान योगी, साधु, ऋषी मुनी रहातात, असे म्हणतात. आपल्या धर्मा प्रमाणे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या पुजा - अर्चा, ध्यान, साधना केल्या जातात.

आध्यात्मिक ज्ञानाच्या ज्ञान गंगेत सिध्दाआश्रमाचे दिव्य रूप वर्णन केलेले आहे. साधु, सिद्ध योगी हे आपल्या दिव्य ज्ञानाने या ब्रह्मांडात भ्रमण करीत असतात, ते नेहमीच या ठिकाणी भेट देतात. सिध्दआश्रम हा आध्यात्मिक चैतन्य, दिव्यरुप, महान ऋषी मुनींची वैराग्य आणि पवित्रभुमी म्हणुन ओळखला जाते. 

सिद्धाश्रम हा मानव, सर्व दृश्य आणि अदृश्य प्राणी मात्रा साठी एक अद्भुत , दुर्लभ आणि दिव्यभुमी आहे. असे असले तरी कठीण तपस्या करणारे ऋषी मुनी, योगी, साधु , संत आपल्या योग आणि साधनेच्या अदभुत शक्तिच्या जोरावर तेथे पोहचतात. सिद्धाश्रम म्हणजे ही हिमालयातील एक गुप्त आणि रहस्यमय भूमि आहे. या ठिकाणी महान सिद्ध योगी, साधु आणि संत यांचे वास्तव्य आहे.

या रहस्यमय आश्रमाचा उल्लेख रामायण, महाभारत, वेद, उपनिषद आणि पुराणा मध्ये आढळून येतो. ऋग्वेद, हा मानव सभ्यता आणि शिक्षणाचा सर्वात अगोदरचा वेद आहे.

सिद्धाश्रम हा सिद्ध योग्यांचे रहिवास स्थान आहे. ज्या सिद्ध पुरुषांना साधन शक्तीच्या ताकदीवर गुरुंचा गुरुपदेश आणि गुरुमंत्र मिळाला आहे, असे सिद्ध पुरुष या आश्रमात पोहचतात. आजही सिद्ध योगी, हट योगी, संन्यासी हजारों वर्षा पासून या ठिकाणी योग साधना आणि ध्यान करीत आहे. 

सर्वात प्रथम स्वामी विशुद्धानंद परमहंस यांनी सार्वजनिकरीत्या या ठिकाणाची चर्चा केली. त्यांनी लहानपणापासूनच योग साधनेला सुरुवात केली होती. त्यांचा काही योग्याशी संपर्क झाला. त्यांच्या बरोबर ते ज्ञानगंज सिध्दआश्रमात पोहचले आणि ध्यान साधना केली.

अशी मान्यता आहे की महर्षि वशिष्ठ, विश्वामित्र, कणाद, पुलस्त्य, अत्रि, महायोगी गोरखनाथ, श्रीमद शंकराचार्य, भीष्म, कृपाचार्य हे युग पुरुष सह - देह येथे भ्रमण करीत असतात. जे कोणी हट योगी, ध्यान साधना करणारे योगी, योगिनी, अप्सरा हे सुध्दा या ठिकाणी आज पण ध्यान करीत आहे, अशी मान्यता आहे.

येथील बगीच्यामध्ये सुंदर रंगी बेरंगी फुले, फळे, झाडे, पक्षी, सिद्धयोगी तलाव, अशा अनेक अद्भुत गोष्टींचे वर्णन करायला शब्द कमी पडतात.

विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तर शोधू शकलेलं नाही. कैलास पर्वताचा एकूणच आकार, त्याचं वातावरण तसेच तिथे येत असलेले अनुभव हे सध्या तरी एक रहस्य आहे. कैलास पर्वताचा उल्लेख अगदी वेदांमध्येही केला गेला आहे. त्यातही कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य असल्याचं म्हंटल गेलं आहे. हे शिखर तिबेट इथल्या मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याचं बोललं जातं. व त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे.

१९८० ला चीन सरकारने प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर ज्यांनी जगातील ८००० मीटर ( २६,००० फुट) पेक्षा जास्ती उंचीची सगळी म्हणजे १४ शिखर सर केली आहेत त्यांना कैलास पर्वतावर आरोहण करण्यासाठी बोलावलं होतं. पण त्याने ते निमंत्रण नाकारलं होतं. 

कैलास पर्वताला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. असं म्हंटल जातं. अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते. यातील सत्यता जाणण्यासाठी आजवर बरेच जणांनी प्रयत्न केले.

२००१ साली चीन सरकारने एका स्वीडनच्या टीम ला ह्या पर्वतावर मोहीम आखण्यास परवानगी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलास पर्वताचं पावित्र्य लक्षात घेता त्या दबावाखाली चीन सरकारला अश्या मोहिमांवर कायस्वरूपी बंदी आणावी लागली. 

असा हा पवित्र, अदभूत कैलास पर्वत आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन आजही हिमालयात उभा आहे. कैलास पर्वताजवळ दोन जलाशय आहेत. मानसरोवर आणि दुसरा राक्षसतळं. जगातील सर्वाधिक उंचीवरचं मानसरोवर हे १५०६० फूट उंचीवर ४१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं, ९० मीटर खोल असलेलं हे सरोवर गोल आहे. ह्यातून ब्रह्मपुत्रा, इंडूस, घगहारा ह्या नद्यांचा उगम होतो.

मानसरोवरचं पौराणिक महत्व खूप आहे. पण त्याच्या फक्त ३.७ किलोमीटर अंतरावर असलेलं राक्षसतळं मात्र ह्या पेक्षा पूर्णतः वेगळं आहे. राक्षसतळं हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं गेल्याची कथा आहे. त्यामुळे ह्याचं पाणी खारट आहे. ह्याच्या उत्तरेकडून सतलज नदीचा उगम होतो. दोन्ही जलाशय इतक्या जवळ असून पण ह्या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे. राक्षसतळ्यात कोणत्याही जलचर आणि जल वनस्पतीचं अस्तित्व आढळून येत नाही. ह्याचे पाणी नेहमी अशांत असते. तर मानसरोवराच पाणी अतिशय शांत आहे. कितीही वारे वाहिले आणि हवेचा जोर असला तरी मानसरोवरा मधील पाणी नेहमीच शांत रहाते. 

कैलास मानसरोवर यात्रा आजही अनेक खडतर यात्रांपेकी गणली जाते. ह्याचं कारण ह्याच्या आसपास न कोणता विमानतळ आहे, न रस्ते आहेत, न कोणतं बंदर आहे. इकडे जायचं असेल तर त्या निसर्गाला शरण जाऊन खडतर पायी प्रवास केल्यावरच ह्या अगम्य पर्वताचे दर्शन मानवाला होते.

क्रमश: 

(हा भाग आवडल्यास ह्याला जास्तीतजास्त शेअर करा धन्यवाद.)

©preetisawantdalvi  

 

पौराणिक कथा (भाग २ )


ह्या भागात आपण अशाच काही अद्भुत आणि अद्वितीय गोष्टींची माहिती घेणार आहोत.

मी खाली दिलेली माहिती अचूक आहे असे मी म्हणणार नाही. परंतू , जर तुम्हाला या ठिकाणांबद्दल अधिक माहिती असेल तर ती आवर्जून मला कमेन्टद्वारे सांगावी. शेवटी आपण सगळे अज्ञानी आहोत.

मला देवी-देवता, रहस्यमय जागा, त्या जागेबद्दलच्या पौराणिक कथा वाचायला आणि ऐकायला खूप आवडतात. म्हणून मी ऐकलेल्या आणि वाचलेल्या काही जागेची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्हालाही हयाबद्दल वाचायला आवडेल अशी मी आशा करते. 

तुम्हाला माहीतच असेल की, जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आपल्या ‘द थेअरी ऑफ रिलेटीविटी’ या सिद्धांतामध्ये असा दावा केला होता की, वेळेचा प्रवास (टाईम ट्रावेलकरणे शक्य आहे आणि त्यांनी त्याचे मार्गही सांगितले होते, ज्याचा वापर करून वेळेचा प्रवास केला जाऊ शकतो. 

पण यातील अनेक मार्ग केवळ अशक्य आहेत जसे की, जर आपण प्रकाशाच्या गतीने प्रवास केला तर आपण वेळेचा प्रवास (टाईम ट्रावेल) करू शकतो पण आपण सर्वजण जाणून आहोत की, आपले तंत्रज्ञान इतके प्रगत नाही की आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकू. 

याच थेअरी ऑफ रिलेटीविटीमध्ये आईन्स्टाईन यांनी ‘वॉर्म होल’ याचा उल्लेख केला आहे.

वॉर्म होल’ म्हणजे असा मार्ग ज्याद्वारे ब्रम्हांडात अस्तित्वात असणाऱ्या दोन ठिकाणामध्ये प्रवास करता येतो.

हा मार्ग अंतराळ आणि वेळ यांच्यातील अंतर कमी करतो म्हणजेच जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचायला आपल्याला जर करोडो वर्षांचा काळ लागत असेल तर खूपच कमी काळात या वॉर्म होलद्वारे आपण त्याठिकाणी सहज पोहचू शकतो. वॉर्म होलच्या दरवाजाला ‘स्टार गेट असेही म्हणतात. 

अस म्हणतात की, हे स्टार गेट पृथ्वीवर आजच्या काळात एकमेव ठिकाणी अस्तित्वात आहे जे की तिरुमला डोंगरावर स्थित आहे. यालाच स्थानिक लोक "शिला तोरणम" या नावाने ओळखतात. स्थानिक लोकांच्या मते, याच दरवाजातून भगवान विष्णू धरतीवर आले होते. स्थानिक लोकच नव्हे तर तेथील सरकार आणि संशोधक देखील मानतात की हे एक स्टार गेट आहे जो एका वॉर्म होलशी जुळलेला आहे.  म्हणून या स्टार गेट जवळ जायला कोणालाच परवानगी नाही.

या शिला तोरणमच्या अवतीभवती सर्वत्र सरकारद्वारे जाळीचे कुंपण घालण्यात आले आहे आणि २४ तास याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. तोरणम जवळ मोबाईल घेऊन जाण्यासही मनाई आहे. काही वर्षांपूर्वी एक पर्यटक मोबाईल घेऊन कुंपणाला पार करून शिला तोरणम जवळ गेला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला. तसेच काही वेळाने त्याचा मृत्यू देखील झाला.

दवाखान्यात नेल्यानंतर असे समजले की, त्याच्या हृदयात बसवण्यात आलेले पेसमेकर त्या दगडांजवळ गेल्यानंतर काम करणे बंद झाले. जेव्हा संशोधकांद्वारे या ठिकाणचे संशोधन केले गेले तेव्हा असे आढळले की, शिला तोरणम च्या दगडांतून मोठ्याप्रमाणात विद्युत चुंबकीय लाटा (इलेक्ट्रॉमॅगनेटिक वेवज्स) निघतात. त्यामुळे बॅटरीवर चालणारी कोणतीही वस्तू याठिकाणी काम करत नाही अथवा त्याचे वाईट परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात त्यामुळे इथे मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली जात नाही. 

भू-वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, दगडांपासून बनलेली अशी रचना जगात अन्यत्र कोठेही नाही. शिला तोरणम हे निसर्गतः बनलेले नाही आणि ही दगडी रचना २ कोटी वर्षे जुनी आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये देवी - देवतांचे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाणे दर्शवले गेले आहे तसेच हिंदू लोकांमध्येही अशी मान्यता आहे की याच शिला तोरणम मधून भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर प्रवेश केला होता.

हे ठिकाण तिरुमला मंदिरापासून केवळ १ किमी अंतरावर स्थित आहे. आपण जर लक्षपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की तिरुमला मंदिरातील भगवान तिरुपतींच्या बाजूला दरवाजासारखी रचना आहे.

वैज्ञानिकांद्वारे या ठिकाणांबाबतचे केले गेलेले दावे आणि हिंदू लोकांची वर्षानुवर्षे चालत आलेली मान्यता हा संयोग असू शकत नाही. आज अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत पण म्हणून आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

तुमचे "शिला तोरणम" बाबतीत काय मत आहे आणि तुम्हाला याबाबत अधिक माहिती असेल तर मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. 

आता पुढे मी तुम्हाला अजून एका जागेची माहिती देणार आहे.

आपला प्राचीन भारत देश हा निश्चितच खूप प्रगतशील होता आणि ते आपल्याला प्राचीन भारतीय मंदिरातील स्थापत्यशास्त्र वरून लक्षात येतेच. सांगण्याचा मुद्दा हा की, आपले जे प्राचीन मंदिर आहेत ते विविध आश्चर्याने भरलेले आहेत. त्यापैकीच एक आश्चर्य म्हणजे ‘ज्वालाजी माता मंदीर’.

हे मंदिर हिमाचल प्रदेशातील कांग्रा या जिल्हयातील असून देवीच्या ५१ शक्ती पीठांपैकी एक आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदीरात इतर मंदिरांसारखी देवीची मूर्ती नसून तेथे एक सतत तेवणारा अग्नी आहे.

आता तुम्ही म्हणाल यात काय आले आश्चर्य?

तर हयात आश्चर्य म्हणजे हा अग्नी विना वात आणि तेलाचा पेटत आहे. तेही एक-दोन नाही तर तर खूप प्राचीन काळापासून म्हणजे महाभारत काळापासून अशी मान्यता आहे. 

याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की, एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण केले नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली.

शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की, “तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस.”  परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिव शंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तेथे जाताच सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली, “की समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे”, त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करावयास सुरुवात केली ते म्हणाले, " शिव हे स्मशानी, भूत-प्रेतांवर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहेत, ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात. त्याचबरोबर त्यांना वस्त्र, आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे, त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे कठीण आहे, त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल ! ".

हे आपल्या पतीविरोधात अपमानास्पद वाक्य सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता हे मनात आणून ती थांबली. ह्या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले.

असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले, त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला, सगळीकडे निसर्गानी कोप घेतला, हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले, सुदर्शनचक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले, तेव्हा शिवाचा राग शांत झाला.

त्यापैकी देवीची जीभ या ठिकाणी पडली होती जिथे आता ‘ज्वालाजी माता मंदीर’ आहे.

असे म्हटले जाते की, या मंदिराचे निर्माण पांडवांनी केले. अकबराने त्याच्या राज्यात हा अग्नी विझविण्याचा प्रयत्न केला होता पण यात तो असफल ठरला. अकबराने शेवटी असफल होऊन देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले होते, पण देवीला ते मान्य नसल्यामुळे ते एका न उलगडून येणाऱ्या धातू मध्ये रुपांतरीत झाले आहे, अशी मान्यता आहे.

एव्हाना तुम्ही विचार केलाच असेल की मंदिराच्या खाली नैसर्गिक वायूचा साठा असणार..

तर १९६० सली प्रंतप्रधान नेहरूंच्या काळात एका विदेशी कंपनी कडून याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अहवाल दिला की येथे मंदिरा खाली कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक वायूचा साठा नाही, व ती कंपनी याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण ही देऊ शकली नाही. त्यामुळे हे वैज्ञानिकांना न कळलेले कोडे आहे. 

या मंदिरात सतत पेटत असणारा अग्नी आणि हा इथे फक्त एकच नाही तर ११-१२ असे अग्नी आहेत. येथे आढळणाऱ्या कुंडातील पाणी हे उकळणाऱ्या पाण्यासारखे दिसते पण ते पाणी थंड आहे, तेथील पुजाऱ्यंच्या म्हणण्याप्रमाणे ह्या कुंडातील पाणी हे अन्न शिजवण्यासाठी उपयुक्त असे आहे.

तुम्ही ह्या संदर्भात जर कुठेही वाचले, ऐकले नसेल. तर तुम्हाला अद्भुत आशा दोन ठिकाणांची माहिती नक्की मिळाली असेल. तुम्हाला पण अशा ठिकाणांबद्दल माहिती असल्यास मला नक्की कळवा.

चला आता भेटूया पुढच्या भागात..

क्रमश: 

(ही कथामालिका आवडत असल्यास कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.)

©preetisawantdalvi